रुग्णालय स्वच्छतेच्या ‘स्मार्ट’ कारभाराचे वाजले बारा; ठेकेदाराकडून कोट्यवधींचा चुराडा, सफाई कामगारांना साहित्याचीही प्रतीक्षा!

Spread the love


हिंगोली जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार: ‘अक्षय साई पात्र अन्नछत्र’ने सफाई कर्मचाऱ्यांना वाटले झाडू आणि खराटे; प्रशासकीय दुर्लक्ष चव्हाट्यावर
हिंगोली (विशेष प्रतिनिधी):
हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या स्वच्छतेचा मक्ता (टेंडर) घेतलेल्या ‘स्मार्ट’ कंपनीचा भोंगळ कारभार आता पुरता चव्हाट्यावर आला आहे. स्वच्छतेच्या नावाखाली शासनाचे दरमहा लाखो आणि वर्षाला कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या या कंपनीकडून प्रत्यक्ष काम करणाऱ्या सफाई कामगारांची मोठी अडवणूक केली जात आहे. रुग्णालयाची इमारत आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लागणारे प्राथमिक साहित्य म्हणजेच झाडू आणि खराटे देखील कंपनीकडून वेळेवर दिले जात नसल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. अखेर कर्मचाऱ्यांची ही दयनीय अवस्था पाहून जिल्हा रुग्णालय परिसरात सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या ‘अक्षय साई पात्र अन्नछत्र सेवा’ संस्थेला पुढे यावे लागले. या संस्थेच्या वतीने आज सकाळी सर्व सफाई कामगारांना स्वखर्चातून झाडू व खराट्यांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या आणि संबंधित ठेकेदाराच्या ‘स्मार्ट’ कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
निधीचा होतोय अपव्यय; शासकीय पैशांची लूट?
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी संपूर्ण जिल्ह्यातून शेकडो गरीब रुग्ण दररोज येत असतात. रुग्णांना संसर्ग होऊ नये आणि आरोग्यदायी वातावरण राहावे, यासाठी प्रशासनाने स्वच्छतेचे टेंडर एका खाजगी कंपनीला दिले आहे. या टेंडरपोटी शासनाकडून दरमहा लाखो रुपयांची बिले अदा केली जातात. मात्र, इतका मोठा निधी खर्च होऊनही जिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न देणे, पीएफची कपात न करणे अशा तक्रारी आधीच असताना, आता चक्क कचरा काढण्यासाठी झाडू सारखे साधे साहित्यही पुरवले जात नसल्याने, हा लाखो रुपयांचा निधी नेमका कोणाच्या खिशात जातोय? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
अन्नछत्र सेवा ठरली ‘धावून आलेली माउली’
साहित्य अभावी स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अविरत अन्नदान सेवा चालवणाऱ्या ‘अक्षय साई पात्र अन्नछत्र सेवा’ यांच्या निदर्शनास आली. कंपनी साहित्याची सोय करत नसल्याचे पाहून, संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ झाडू आणि खराटे खरेदी केले. आज सकाळी एका विशेष कार्यक्रमात या सर्व साहित्याचे सफाई कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले. साहित्य हाती पडताच कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, तर उपस्थित नागरिकांनी ठेकेदाराच्या निषेधार्थ तीव्र भावना व्यक्त केल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर, गजानन महाजन, नागेश झडके, संजय ननावरे, बंडू दंडगे, किशोर लोलगे, किशोर खंदारे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वरिष्ठ अधिकारी डोळे मिटून आहेत का? नागरिकांचा थेट सवाल
“जर शासनाकडून स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर होत असेल आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या गोरगरीब कर्मचाऱ्यांना हातात धरण्यासाठी खराटाही मिळत नसेल, तर या टेंडरचा गोरगरिबांना काय फायदा? हा निधी लाटणाऱ्या ठेकेदारावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या रुग्णालय प्रशासनावरील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का होऊ नयेत?” असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी केला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणात जिल्हा शल्यचिकित्सक आणि वरिष्ठ अधिकारी या ‘स्मार्ट’ कंपनीवर काय दंडात्मक कारवाई करतात की नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पांघरूण घालतात, याकडे संपूर्ण हिंगोलीकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *