
शासकीय सेवा-सुविधांचा लाभ मिळवून देण्यावर भर हिंगोली, एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना विविध शासकीय सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांच्या वतीने आज विविध विभागांतील अधिकाऱ्यांची संवेदीकरण बैठक घेण्यात आली. यावेळी एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या सामाजिक समावेशनाबाबत चर्चा करण्यात आली.बैठकीत श्री.चौधरी यांनी एचआयव्ही प्रतिबंध, जनजागृती आणि संसर्गित व्यक्तींना विविध शासकीय सेवा व सुविधांचा लाभ मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन केले. संबंधित व्यक्तींना आवश्यक सेवा-सुविधा मिळवून देताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच एचआयव्हीबाबतची भीती, भेदभाव दूर करण्यासाठी सर्व विभागांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.या बैठकीस माविमचे बाळासाहेब झिंजाडे, संतोष ठाकूर, महिला व बालकल्याण विभागाचे जी. जी. कापसे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त हरिभाऊ पोपळघट, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे श्रीराम मगर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. श्रीधर घुगे, संजय गांधी योजनेचे संजय पाईकराव, वन स्टॉप सेंटरचे दिनेश पाटील, बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेम्बाडे, जिल्हा दिव्यांग समन्वयक केंद्राचे विजय मारकड आणि विहान संस्थेच्या समन्वयक अलका रणवीर उपस्थित होते.