शासनाने जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली; मात्र प्रत्यक्ष ताबा मिळत नसल्याचा दावा
उपजिल्हाधिकारी काय निर्णय घेणार इनामदार पट्टेदार यांचे समाधान करणार का ? अथवा महसूल मंत्र्यांचा आदेशच हवा!

हिंगोली – सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील श्रीरामचंद्र देवस्थान नर्सी नामदेवची देवस्थान इनाम जमीन ताब्यात मिळावी, यासाठी देवस्थानचे इनामदार पट्टेदार धोंडीराज वासुदेव पाठक यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. शासनाकडून जमीन निगराणीत घेण्याची प्रक्रिया झाल्यानंतरही संबंधित जमिनीचा प्रत्यक्ष ताबा मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.निवेदनानुसार, गट क्रमांक ३५० मधील देवस्थान इनाम जमिनीवर अनधिकृत ताबा असल्याचे निदर्शनास आले होते. हा ताबा काढून जमीन शासन निगराणीत घेण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जमीन शासन निगराणीत घेण्यात आली, तसेच सदर जमीन सध्यास्थितीत पडीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही जमीन देवस्थान इनामदाराच्या ताब्यात देण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.चौकट ——-कागदोपत्री प्रक्रिया झाली, मग ताबा कधी !जमिनीचा ताबा मिळण्यासाठी वारंवार अर्ज करूनही कायदेशीर व नियमानुसार कार्यवाही होत नसल्याने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असून, देवस्थानचे आर्थिक नुकसानही होत असल्याचे पाठक यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे स्वत:च्या हक्काची देवस्थान इनाम जमीन विनाविलंब मिळवून द्यावी, अशी मागणी महसूलमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. महसूल विभागाच्या निर्णयाकडे आता देवस्थान इनामदारांचे लक्ष लागले आहे.