
हिंगोली – बळसोंड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अंतूले नगर येथील संकट मोचन हनुमान मंदिरात रविवारी सकाळी सहा वाजता राष्ट्रसंत नामदेव महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष त्र्यंबक तावरे यांच्या हस्ते संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात हजारो दीपोत्सव लावण्यात आले. दिव्यांचा प्रकाश झोतात मंदिर परिसर उजळून निघाला.
अंतूले नगर येथील जागृत दक्षिण मुखी संकट मोचन हनुमान मंदिरात रविवारी राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंदिर संस्थांच्या वतीने भव्य दिव्य असी विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
भाविकांनी पणत्या लावून संत नामदेव महाराज जन्मोत्सव मोठ्या उत्साह साजरा केला. त्यानंतर काकडा आरतीस प्रारंभ झाला. जवळपास काकडा आरती ही आठ वाजेपर्यंत सुरु होती. यावेळी अंतूलेनगर सह, नामदेवनगर, आनंदनगर, शिक्षक कॉलनी, गोविंदनगर, अंधारवाडी, माऊलीनगर सह आदी नगरातील शेकडो भावीक, यात महिलांची संख्या लक्षनीय दिसून आली. यावेळी भजनी मंडळ,आदिनी तीन तास अनेक अभन्ग गायले.नामदेव जनाबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, सोपान काका मुक्ताबाई रामकृष्ण हरी, श्री राम जयराम जयजय राम, आदींचा गजर करण्यात आला. यावेळी फुगडी खेळण्यात आली. दरम्यान, काकडा आरती संपताच उपस्थित भावीकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.