
महाराष्ट्र चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (MACCIA) चे कमिटी मेंबर आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर महासंघचे अध्यक्ष श्री सुरेश भाई ठक्कर यांनी सांगितले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्याचे गुण विकसित केले जाणार आहे. विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण व्हावेत या दृष्टीने विद्यापीठाचा व्यवसाय व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर यांच्या दरम्यान सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या सभा कक्षात सामंजस्य करार (MoU) हस्तांतरण कार्यक्रम शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी पार पडला.
सामाजिक विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक, औद्योगिक, संशोधन, कौशल्य विकास, नवोपक्रम, शिक्षक क्षमता विकास, विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप तसेच औद्योगिक समस्यांचे निराकरण यासारख्या स्वतंत्र उपक्रमांद्वारे आणि / किंवा संबंधित उपक्रमांअंतर्गत उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करणे करण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.
यावेळी चेंबरचे अध्यक्ष श्री. रविंद्र माणगावे यांनी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरची स्थापना, कार्य आणि भविष्यकालीन उपक्रमांबाबत विस्तृत माहिती दिली. प्रत्येक गावामध्ये उद्योजक निर्माण व्हावेत या दृष्टीने चेंबर उपक्रम राबवित आहे. गावागावांमध्ये उद्योगांवर चर्चा व्हावी या दृष्टीने उद्योजक विचार मंच निर्माण करण्यात आला आहे. या माध्यमातून उद्योजक होण्याकरिता प्रशिक्षण तसेच भांडवल उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन करीत आहे. चेंबर्सने ६० देशांसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी चर्चेदरम्यान कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित ग्रामीण भागातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उद्योजक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक गुण निर्माण करण्यासह प्रत्येक तालुक्यात महाविद्यालयांना केंद्र निर्माण करीत अन्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष श्री. रवींद्र मानगावे, चेंबरचे गव्हर्निंग बॉडी सदस्य श्री. सी.पी. ठक्कर, चेंबरचे महासचिव श्री. सुरेश घोरपडे, सदस्य श्री. राजन ठवकर, तसेच माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेधा कानेटकर, विद्यापीठ व्यवसाय व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. राहुल खराबे, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.